Facebook, Instagram hyaansaarakhyaa samaajmaadhyamaanvar halli aapan Marathit samparka saadhataanaa kaahiisha ashaach prakaare lihito. Vaachakanpaikii kaahi jananna haa majakoor vaachataana kadaachita kaahi adachan vatanar naahi.
असे का?
वरील मजकुराची भाषा मराठी आहे, पण ती लिहायला इंग्रजी अक्षरांचा म्हणजेच लॅटिन लिपीचा वापर केला आहे. हा असा मजकूर वाचताना थोडे कष्ट पडतात; पण तो देवनागरीत लिहिला की सहज उलगडू लागतो. उदा॰ वरच्याच वाक्यातील जणांना हा शब्द लॅटिन लिपीत लिहिताना j-a-n-a-n-n-a असा लिहावा लागतो, पण त्यात ‘ण’साठी आणि ‘न’साठी लॅटिन लिपीत केवळ ‘n’ हेच अक्षर असल्यामुळे मराठीतील दोन्ही ध्वनींसाठी एकच लॅटिन अक्षर वापरता आले.
वरील मजकुराची भाषा मराठी आहे, पण ती लिहायला इंग्रजी अक्षरांचा म्हणजेच लॅटिन लिपीचा वापर केला आहे. हा असा मजकूर वाचताना थोडे कष्ट पडतात; पण तो देवनागरीत लिहिला की सहज उलगडू लागतो. उदा॰ वरच्याच वाक्यातील जणांना हा शब्द लॅटिन लिपीत लिहिताना j-a-n-a-n-n-a असा लिहावा लागतो, पण त्यात ‘ण’साठी आणि ‘न’साठी लॅटिन लिपीत केवळ ‘n’ हेच अक्षर असल्यामुळे मराठीतील दोन्ही ध्वनींसाठी एकच लॅटिन अक्षर वापरता आले.
सर्वात आधी आपण लिपी आणि भाषा ह्यांमधील फरक स्पष्ट करून घेऊ. भाषा ही उच्चारित ध्वनींपासून बनलेली असते तर लिपी ही त्या भाषेतील ध्वनींचे प्रतिरूपण करणाऱ्या दृश्यचिन्हांपासून बनलेली असते. मराठी ही भाषा आणि देवनागरी ही तिची लिपी आहे. देवनागरी ही लिपी मराठीव्यतिरिक्त संस्कृत, हिन्दी, कोंकणी ह्या भाषांसाठीही वापरली जाते. अनेकदा आपण देवनागरीत लिहिलेल्या अक्षरांना मराठी अक्षरे असेही संबोधतो. पण प्रत्यक्षात तसे नसते. ती अक्षरे देवनागरी लिपीतील असली, तरी त्यांची भाषा मराठी नसू शकते. त्यामुळे अनेक भाषांसाठी जेव्हा एकच लिपी वापरली जाते, तेव्हा ह्या गोष्टीचे भान ठेवावे लागते. काही लिप्यांना मात्र त्यांच्या भाषेचीच नावे दिलेली असतात. उदा॰ बाङ्ला भाषेच्या लिपीचे नाव बाङ्ला असेच आहे.
लिपीत कोणत्या गोष्टी आवश्यक असतात?
विशिष्ट लिपीसाठी पुढील गोष्टी विचारात घेतल्या जातात.
१. लिपीतील चिन्हांद्वारे केले जाणारे वर्णन.
२. त्या चिन्हांचे लेखनातील दृश्यरूप.
३. त्या चिन्हांच्या लेखनाची-वाचनाची दिशा.
वर नोंदवल्याप्रमाणे, मौखिक भाषेला चिन्हांकित करणे हे लिपीचे कार्य असते. त्यामुळे लिप्यांमध्ये भाषिक घटकांवर आधारलेली चिन्हे असतात. ह्या चिन्हांमध्ये मुख्यत्वे ध्वनि-आधारित आणि अर्थ-आधारित असे दोन गट मानता येतील.
अर्थ-आधारित
लिप्यांमधील चिन्हे ही ‘शब्द’ ह्या भाषिक घटकावर आधारलेली असतात. उदा॰ चिनी लिपीच्या चित्रलिपीत (pictograph) शब्द चित्ररूपात चिन्हित केला जातो तर कल्पनालिपीत (ideograph) एखाद्या संकल्पनेचे चिन्हांकन केले जाते.
ध्वनि-आधारित
लिप्यांमध्ये जेव्हा ध्वनीवर आधारित चिन्हे असतात तेव्हा त्यांच्यात स्वर आणि व्यंजन ह्यांच्या आधारे त्यांचे वेगवेगळे गट पडतात. ह्यांच्यात स्वराला स्वतंत्र, व्यंजनाला स्वतंत्र आणि स्वर-व्यंजन ह्यांच्या संयोगाला (अक्षराला) स्वतंत्र अशा प्रकारे चिन्हांकन केलेले असते.
१. स्वतंत्र स्वर आणि स्वतंत्र व्यंजन (वर्णलिपी)
ह्या लिपीत व्यंजन आणि स्वर ह्यांसाठी स्वतंत्र चिन्हे असतात. उदा॰ लॅटिनमधील a, e, i, o, u हे स्वर आणि b, c, d इ॰ ही व्यंजने.
२. केवळ स्वतंत्र व्यंजन (व्यंजनलिपी)
ह्या लिप्यांमध्ये स्वरासाठी स्पष्ट चिन्ह उपलब्ध असले तरी त्यांचा वापर लेखनात केला जातोच असे नाही. विशेषतः व्यंजनचिन्हेच वापरली जातात. उदा॰ अरबी लिपी. अशा लिप्यांमध्ये संदर्भांनुसार स्वर गृहित धरला जातो.
३. केवळ अक्षर (अक्षरलिपी)
ह्या लिप्यांमध्ये व्यंजन आणि स्वर ह्यांच्या प्रत्येक संयोगाला वेगळे चिन्ह असते. उदा॰ जपानी लिपीत का, के, कू अक्षरांमध्ये ‘क’ हा ध्वनी समान असला तरी त्याचे दृश्यरूप प्रत्येक अक्षरामध्ये वेगळे दिसून येते.
४. स्वतंत्र अक्षर व स्वतंत्र स्वर-व्यंजन ह्यांवर आधारित (वर्णाक्षरलिपी)
ह्या गटात मोडणाऱ्या लिप्यांमध्ये अक्षर म्हणजेच स्वर आणि व्यंजन ह्यांच्या संयोगासाठी विशिष्ट चिन्ह असतेच, मात्र त्यांमध्ये स्वतंत्रपणे स्वर आणि व्यंजन दाखवणाऱ्या चिन्हांचाही समावेश असतो. देवनागरी ही ह्या गटात मोडणारी लिपी आहे. देवनागरीत व्यंजनचिन्हे (क, ख, ग…) आणि स्वरचिन्हे (अ, आ, इ…) ह्यांसोबतच ज्यांना अनुक्रमे काना, वेलांटी, उकार म्हणून ओळखतात ती स्वरांशचिन्हे (ा, ी, ू ) अशी चिन्हेही आढळतात.
अक्षर हा देवनागरीतील एक भाषिक घटक असून तो एकतर स्वतंत्र स्वर, स्वतंत्र व्यंजन अथवा व्यंजन आणि स्वर तसेच व्यंजन-व्यंजन ह्यांचाही संयोग असू शकतो. उदा॰ अ (स्वर), क (क् + अ — व्यंजन + स्वर), ओम् (स्वर + व्यंजन). देवनागरीत उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांमध्ये स्वर किमान आवश्यक असतो. त्याला जोडून एक किंवा अधिक व्यंजने असू शकतात.
लिप्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धती
इंग्रजीच्या वर्णक्रमाला म्हणजेच लॅटिन लिपीला ‘अल्फाबेट’ असे संबोधतात. वास्तविकतः ती ग्रीक लिपीवर आधारलेली असून ग्रीक लिपीतील अल्फा आणि बीटा ह्या सुरुवातीच्या दोन अक्षरांवरून तिला ते नाव योजले आहे.
वर नोंदवल्याप्रमाणे देवनागरीत जशी स्वर, व्यंजन, स्वरांशचिन्हे इ॰ वेगवेगळी चिन्हे उपलब्ध आहेत तशीच बाङ्ला, कन्नड ह्यांसारख्या इतर भारतीय लिप्यांमध्येही उपलब्ध आहेत. पण ही बाब केवळ भारतापुरतीच मर्यादित नाही; तर ख्मेर, थाई आणि इथियोपियन ह्या लिप्यांचेही स्वरूप असे आहे. इथियोपियनसदृश लिप्यांचे वर्णाक्षरलिपी हे स्वरूप लक्षात घेऊन त्यांच्यासाठी १९९० साली पीटर डॅनियल्स ह्या भाषावैज्ञानिकाने ‘आबुगिडा’ (Abugida) हा शब्द योजला. हा शब्द त्याने इथियोपियन लिपीच्या ‘गेइझ्’ (Geʽez) ह्या भाषेतील अक्षरांच्या आधारे घडवला. मात्र ‘अल्फाबेट’प्रमाणे आ-बु-गि-डा ही अक्षरे ह्या लिपीतील सुरुवातीची अक्षरे नाहीत. हा क्रम योजताना डॅनियल्सने त्या भाषेतील अक्षरांनुसार क्रम न ठेवता सेमेटिकआधारित ग्रीक आणि हिब्रू ह्या लिप्यांतील अक्षरांनुसार ठेवला. म्हणजेच, ज्याप्रमाणे ग्रीकमध्ये अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि हिब्रूत अलेफ, बेथ, गिमेल, डालेत असा क्रम असतो — त्याच धर्तीवर गेइझ् ह्या भाषेतील वर्णाक्षरांचा अंतर्भाव दर्शवण्यासाठी आ-बु-गि-डा असा क्रम घेऊन डॅनियल्सने हे नाव योजले. ह्याच पद्धतीला अनुसरून डॅनियल्सने केवळ व्यंजनांवर आधारलेल्या लिपीसाठी ‘अबजद’ (Abjad) हा शब्द योजला.
वर पाहिले तसे लिपींचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांचे डॅनियल्सप्रमाणेच डिरिंजर, ब्राईट, फिशर इ॰ भाषावैज्ञानिकांनी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. वर पाहिल्याप्रमाणे देवनागरीच्या लिपि-प्रकारासाठी डॅनियल्सने जसा आबुगिडा हा शब्द योजला, तसेच डिरिंजर ह्याने ‘सेमिसिलॅबरी’ असा शब्द तर ब्राईट ह्याने ‘अल्फासिलॅबरी’ असा शब्द योजला आहे. डिरिंजर आणि ब्राईट ह्यांनी योजलेली नावे ही देवनागरीच्या भाषिक स्वरूपाला अनुसरून योजलेली आहेत. मिलिंद मालशे ह्यांनी त्यासाठी ‘अक्षरमाला’ हा शब्द योजला आहे.
लिपीतील चिन्हांचे दृश्यरूप
लॅटिन लिपीत अक्षरे स्वतंत्र असतात आणि लेखन करताना त्यांच्या मूळ दृश्यरूपात फरक होत नाही व ती स्पष्ट ओळखताही येतात (अपवाद : कर्सिव्ह लिपी). मात्र, देवनागरीसारख्या लिपीत स्वर-व्यंजनांचा किंवा व्यंजन-व्यंजनांचा संयोग होताना अक्षराच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. उदा॰ रूप (र् + ू + प् + अ) किंवा तक्ता (त् + अ + क् + त् + आ).
काही लिप्यांमध्ये अक्षरे एकमेकांत मिसळूनही लिहिली जातात. उदा॰ मोडी लिपीत ‘कमलाकर’ हा शब्द लिहिताना ‘र’ हे अक्षर त्याच्या आधीच्या ‘क’ ह्या अक्षरात गुंफून लिहिले जाते. (आकृती १ पहा.)
![]() |
|
आकृती १ : मोडी लिपीत लिहिलेला 'कमलाकर' हा शब्द (छायाचित्र साभार : दीपक पटेकर) |
लिपीच्या लेखनाची-वाचनाची दिशा
लिपीतील चिन्हांचे स्वरूप आणि त्यांचे दृश्यरूप कसे असते ते आपण पाहिले. लिपी कोणत्या दिशेत लिहिली आणि वाचली जाते हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. उदा॰ देवनागरी आडव्या रेषेत आणि डावीकडून उजवीकडे लिहितात व तशीच वाचतातही. उर्दू हीदेखील आडवीच लिहिली जात असली तरी ती मात्र उजवीकडून डावीकडे अशी लिहितात व वाचतात. काही लिप्या ह्या उभ्या रेषेतही लिहिल्या जातात. वरून खाली अशी त्यांची लेखनाची व वाचनाची दिशा असते. उदा॰ चिनी व जपानी लिपी. काही जुन्या लिप्यांमध्ये आडव्या ओळीत एकदा डावीकडून उजवीकडे आणि पुढील ओळीत उजवीकडून डावीकडे लिहिले व वाचले जात असे. अशा पद्धतीला नांगरटीची पद्धत (बॉस्ट्रोफेडन) असे म्हणतात. (आकृती २ पहा.)
लिप्यांतील काटकसरीचे तंत्र
लिप्यांचे प्रकार पाहताना चित्रलिपीसारखे प्रकार सोडले तर भाषिक ध्वनींवर आधारलेल्या लिप्यांमध्ये त्या भाषेतील ध्वनींची मर्यादा असते आणि त्यानुसार त्यांमधील चिन्हेही विशिष्ट मर्यादेमध्ये असतात. असे असले तरी एका ध्वनीला केवळ एकच चिन्ह अशी व्यवस्था पूर्णपणे वास्तवात शक्य नसते. उदा॰ इंग्रजीमध्ये ‘अ’ हा ध्वनी दर्शवण्यासाठी a (about) किंवा u (but) ही दोन्ही अक्षरे वापरली जातात.
हा प्रकार लॅटिनसारख्या लिप्यांमध्येच आढळतो असे नाही. देवनागरीतही तो काही प्रमाणात आढळतो. उदा॰ देवनागरी लिपी वापरणाऱ्या मराठी भाषेत चलन आणि चरखा ह्या शब्दांमधील ‘च’ उच्चार वेगळा असला, तरी तो दर्शवण्यासाठी ‘च’ हेच अक्षर उपलब्ध आहे. च प्रमाणेच ज (जग — जहाज), झ (झेलणे — झरा) ह्या अक्षरांच्या बाबतीतही हेच लागू होते. उच्चारातील हा भेद मराठीच्या निजभाषकांना संदर्भाप्रमाणे लक्षात येतो.
‘च’च्या ह्या उच्चारातील भेदाचा फरक नोंदवण्यासाठी सुरुवातीच्या मुद्रित पुस्तकांमध्ये प्रयत्न झालेले आढळतात. १८२९ सालातील महाराष्ट्र भाषेचा कोश ह्या कोशात ‘च’चे उच्चारभेद स्पष्ट करण्यासाठी शिरोरेखेत टिंब योजण्याची पद्धत वापरली होती. उदा॰ चरख्यातील ‘च’ नोंदवताना शिरोरेखेत टिंब देत असत. (आकृती ३ पहा.)
![]() |
|
आकृती ३ : ‘च’च्या भिन्न उच्चारानुसार भिन्न चिन्हांची सोय |
महाराष्ट्र भाषेचा कोश अर्थात पंडिती कोश हा वास्तविकतः मुंबईतील शिक्षामंडळींच्या आदेशावरून तयार केलेला होता व युरोपीय वाचकांसाठी ह्या कोशाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे ‘च’ च्या उच्चारातील भेद अधिक स्पष्ट करण्यासाठी तेवढी खबरदारी घेतली असावी हे स्पष्ट होते. अन्यथा मराठी निजभाषकांसाठी हा भेद संदर्भाने लक्षात येण्यासारखा असतो; आणि म्हणूनच नंतरच्या काळात कदाचित असा प्रयत्न पुन्हा करण्यात आला नसावा.
मजकूर वाचताना आपल्या भाषेचा आणि लिपीचा ‘साक्षर निजभाषक’ म्हणून किती गोष्टी आपण शिकलेलो असतो ह्याची कल्पना वरील विवेचनावरून आली असेलच !
(ह्या लेखासाठी सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी सहाय्य केले आहे.)






