बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

विरामचिन्हांची गोष्ट

 

What is in the name?

नावात काय आहे?

वरच्या उदाहरणाचे नीट निरीक्षण केले, तर पहिले वाक्य इंग्रजीत आणि लॅटिन अथवा रोमन लिपी वापरून लिहिले आहे आणि दुसरे वाक्य मराठीत आणि देवनागरी लिपी वापरून लिहिले आहे. लॅटिन आणि देवनागरी ह्या दोन भिन्न स्वरूपाच्या लिप्या आहेत. पण दोन्ही वाक्ये प्रश्नार्थी आहेत हे दाखवण्यासाठी मात्र प्रश्नचिन्हच वापरले आहे. म्हणजे लिप्या वेगळ्या असल्या, तरी प्रश्नार्थक आशय व्यक्त करण्याचे चिन्ह मात्र एकच आहे. असे कसे?

प्रश्नचिन्ह हे विरामचिन्हांच्या संचातील एक चिन्ह आहे हे आपल्याला माहीत आहेच. प्रश्नचिन्हासोबतच आपण पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह इ॰ सारखी अनेक विरामचिन्हे मराठीत वापरतो, पण हीच चिन्हे आपण इंग्रजीतही वापरतो. पण मग ही चिन्हे देवनागरी लिपीतील आहेत की लॅटिन लिपीतील? देवनागरी आणि लॅटिन दोहोंमध्ये एकसारखीच विरामचिन्हे कशी? आपण सध्या वापरत असलेली विरामचिन्हे ही लॅटिन लिपीतून स्वीकारलेली आहेत. वास्तविकतः लॅटिन लिपीतही ही चिन्हे स्थिरावण्यासाठी जवळपास हजार वर्षांचा कालावधी लागला. माल्कम पार्केस ह्या लेखकाच्या ‘पॉझ ॲण्ड इफेक्ट : ॲन इण्ट्रोडक्शन टू द हिस्ट्री ऑफ पंक्चुएशन इन द वेस्ट’ ह्या पुस्तकात युरोपातील विरामचिन्हांचा चिकित्सक इतिहास मांडला आहे. ग्रीक-लॅटिन अशा जुन्या भाषांपासून इंग्रजीपर्यंत विरामचिन्हांचा प्रवास कसा होत गेला हे ह्या पुस्तकात नोंदवले आहे.

पूर्वी लेखन करताना लिपिचिन्हे सलग लिहिली जात असत. ह्या पद्धतीला इंग्रजीत ‘स्क्रिप्चुरा कण्टिन्युआ’ (Scriptura continua) असे म्हणतात. आपण तिला ‘सलग लेखन’ म्हणू. आपल्याकडेही जुन्या शिलालेखांमध्ये, ताम्रपटांमध्ये आणि हस्तलिखितांमध्ये ही पद्धत होती. (चित्र क्र॰ १ पाहा.) पण असा सलग मजकूर वाचणे हे अनेकदा अडचणीचे होत असे. कारण त्यात शब्द, वाक्य आणि परिच्छेद असे मजकुराचे विभाग नसत. ह्या सलग लेखनाचे मराठीत एक प्रसिद्ध उदाहरण सांगितले जाते, ते असे — ‘रस्त्यातनाचतमासेचाललेहोते’. ह्या वाक्यात शब्दांदरम्यान अंतर नसल्यामुळे त्याचे वाचन कुणी ‘रस्त्यात नाचत मासे चालले होते’ तर कुणी ‘रस्त्यात नाच तमासे चालले होते’ असेही करू शकतात. तात्पर्य, अंतर न दिल्यामुळे आशयाचा अर्थ बदलण्याची शक्यता असते.


चित्र क्र॰ १ : सलग लेखनाचा नमुना — पळसदेव येथील सरडेश्वराचा शिलालेख (शके १०७९ / सन ११५७)

ही पद्धत रूढ असतानाच, युरोपात जेव्हा वक्तृत्वकला उदयाला आली तेव्हा प्रभावीपणे वक्तृत्व करण्यासाठी — म्हणजेच आवश्यक तिथे थांबणे, आवाजात चढउतार राखणे, इ॰ परिणाम साधण्यासाठी — लोक आपापल्या लेखनप्रतींवर ‘वाचनाच्या सोयीसाठी’ खुणा करू लागले. अशा अनेक पद्धतींच्या आधारे लेखनात लिपिचिन्हांसोबतच इतर चिन्हेही समाविष्ट व्हायला सुरुवात झाली. ह्यांपैकी एक प्रयत्न म्हणजे डोनेटस ह्याची ‘डिस्टिन्क्शनिस्’ (distinctiones) पद्धत. ह्यात मजकुराचा विभाजक म्हणून बिंदू वापरला जाई. इलियस डोनेटस हा रोमन व्याकरणकार आणि वक्तृत्वकलातज्ज्ञ होता. डोनेटसच्या मते वाक्यामध्ये बिंदूंच्या आधारे विराम दाखवता येतो — अल्प विरामासाठी अक्षराच्या तळापाशी बिंदू देऊन (subdistinctio), किंचित दीर्घ विरामासाठी अक्षराच्या मध्यापाशी बिंदू देऊन (media distinctio) आणि अंतिम विरामासाठी अक्षराच्या डोक्यापाशी बिंदू देऊन (distinctio). डोनेटसने निर्माण केलेली ही पद्धती म्हणजे सध्याच्या स्वल्पविराम, अपूर्णविराम आणि पूर्णविरामाप्रमाणे (अनुक्रमे) कार्य करणारी आहे.

अशा प्रकारे विरामचिन्हे कालान्तराने घडत गेली. काही चिन्हे नव्याने तयार करण्यात आली, तर काही बाद झाली. तर काहींची दृश्यरूपे बदलत गेली. प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह ही अक्षरांपासून तयार झालेली चिन्हे आहेत असाही दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. प्रश्नासाठी लॅटिनमध्ये quaestio हा शब्द वापरत. वाक्य प्रश्नार्थी असेल तर त्या वाक्याच्या शेवटी ह्या शब्दाचा संक्षेप q च्या खाली o देऊन नोंदवला जाई. कालान्तराने जलद हस्ताक्षरासारख्या प्रभावामुळे q आणि o ही अक्षरे वेगळी न राहता त्याचे दृश्यरूप आताच्या प्रश्नचिन्हासारखे झाले. उद्गारचिन्हाच्या बाबतीतही अशीच माहिती सांगितली जाते.

विरामचिन्हे अशा प्रकारे विकसित होत राहिली आणि कालानुरूप त्यांचा संचही फारच बदलत गेला. शिवाय त्यांच्या वापरही वेगवेगळ्या पद्धतीने केला जाई. मात्र, सोळाव्या शतकात मुद्रणाच्या उदयानंतर हा संच स्थिरावण्याचे आणि त्याप्रमाणेच त्यांचा वापरही नियमित करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात.

युरोपात लॅटिन विरामचिन्हे कशी विकसित होत गेली हे आपण थोडक्यात पाहिले. आता ही चिन्हे आपल्याकडे कशी आली ते पाहू.

एकोणिसाव्या शतकात युरोपीयांच्या संपर्कातून, विशेषतः इंग्रजी भाषेच्या संपर्कातून भारतीय भाषांमध्ये ह्या विरामचिन्हांचा समावेश होऊ लागला. मराठीत विशेषतः मुद्रण-तंत्रज्ञानाच्या उदयाबरोबर ह्या विरामचिन्हांचा वापर सुरू झालेला आढळतो. पण त्यापूर्वी मराठीत विरामचिन्हेच नव्हती असे नाही.

मराठी पूर्वी देवनागरी आणि मोडी लिपीतही लिहिली जाई. देवनागरीत लिहिताना तिच्यात दंड (एकेरी आणि दुहेरी दंड), विसावा, संक्षेपचिन्ह, काकपद अशी चिन्हे वापरात होती. (चित्र क्र॰ २ पाहा.) दंडाचा वापर पद्यरचनेमध्ये चरणाची समाप्ती दाखवण्यासाठी केला जाई. महानुभावीय साहित्यात विसावा हे चिन्ह वाक्य पूर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी वापरले जात होते. (चित्र क्र॰ ३ ) ह्याव्यतिरिक्त, संक्षेप दाखवण्यासाठी पोकळबिंदूचे संक्षेपचिन्ह आणि अनावधानाने राहून गेलेला शब्द नोंदवण्यासाठी काकपदाचा वापर केला जात होता. मोडी लिपीत ह्या चिन्हांचा वापर केला जात नव्हता. मात्र, संक्षेप नोंदवण्यासाठी तिच्यात दुरेघी वापरली जात असे. (चित्र क्र॰ ४)


चित्र क्र॰ २ : देवनागरीतील विरामचिन्हे — रुक्मिणीस्वयंवराच्या हस्तलिखितातील (शके १४९३ / सन १५७१) दुहेरी दंड आणि पोकळबिंदूचे संक्षेपचिन्ह (समासात).



चित्र क्र॰ ३ : अब्दप्रक्रिया ह्या हस्तलिखितात (काळाचा उल्लेख नाही) वाक्यपूर्तीची खूण म्हणून वापरला जाणाऱ्या विसाव्याचा नमुना.


चित्र क्र॰ ४ : मोडी लिपीतील दुरेघी.

मराठीत आधी पद्यरचनायुक्त ग्रंथांचे प्रमाण जास्त होते. पण, वसाहतकाळामध्ये इंग्रजी आणि इतर युरोपीय भाषांच्या संपर्कातून मराठीसोबतच अन्य भारतीय भाषांमध्येही गद्यग्रंथांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. ह्या गद्यप्रकारांच्या आवश्यकता पुरवणारी चिन्हे मराठीच्या जुन्या चिन्हसंचात उपलब्ध नव्हती. म्हणून नव्या आवश्यकता पुरवण्यासाठी लॅटिनमध्ये उपलब्ध असलेल्या विरामचिन्हाच्या संचामधून काही विरामचिन्हे हळूहळू स्वीकारण्यात आली. असे करताना देवनागरी लिपीतील चिन्हे पूर्णपणे वगळण्यात आली नाहीत. त्यांचाही समावेश ह्या संचात करण्यात आला.

विरामचिन्हांचा हा मिश्र संच असलेले मराठीतील पहिले मुद्रित पुस्तक म्हणजे श्रीरामपूर येथे छापलेले विल्यम केरी ह्यांचे ‘ए ग्रामर ऑफ मह्रट्टा लॅंग्वेज’ (१८०५). ह्या पुस्तकात मराठी-देवनागरी मजकुराचे प्रमाण कमी असले तरीही त्यात आवश्यक त्या विरामचिन्हांचा समावेश केलेला आढळतो.

त्यानंतर छापलेल्या पुस्तकांमध्ये विरामचिन्हे कमी-अधिक प्रमाणात आढळतात. पुढे मिशनरी-ख्रिस्ती धर्मोपदेश आणि सरकारच्या सहाय्याने शाळा सुरू झाल्या तसेच लोकसहभागातून खाजगी शाळाही सुरू झाल्या. त्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती होऊ लागली. शिवाय, ह्या काळातच दर्पण (१८३२), ज्ञानचंद्रोदय (१८४०) ह्यांसारखी वृत्तपत्रे आणि नियतकालिकेही सुरू झाली. त्यामुळे गद्य मजकूर मोठ्या प्रमाणात मुद्रित स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागला. ह्या सर्व लेखनात लॅटिनमधून स्वीकारलेली विरामचिन्हे अधिक वापरलेली दिसतात, मात्र त्यांच्या वापराचे प्रमाणीकरण झालेले नव्हते. ही गरज लक्षात घेऊन, चिन्हांच्या वापराविषयी स्पष्टता यावी म्हणून थॉमस कॅण्डी आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली.

कॅण्डी हे ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी खात्यातील कर्मचारी म्हणून भारतात आले. त्यांनी मराठी भाषेची परीक्षा दिल्यामुळे त्यांची दुभाषी म्हणून नेमणूक करण्यात आली. पुढे त्यांची नेमणूक मुंबई सरकारचा ट्रान्सलेटर म्हणून झाली. त्यावेळी प्रकाशित होणारी मराठी पुस्तके आणि नियतकालिके भाषेच्या दृष्टीने तपासण्यासाठी त्यांच्याकडे पाठवली जात. ह्या सर्व अनुभवाच्या आधारे कॅण्डींनी १८५० साली ‘विरामचिन्हांची परिभाषा’ (Marathi Punctuation) हे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपला हेतू पुढीलप्रमाणे सांगितला आहे —

 

मराठी भाषेंतील ग्रंथांत विरामचिन्हें घालण्याची चाल मागें नव्हती; परंतु, युरोपखंडांतील इंग्लिश वगैरे भाषांमध्यें ह्या चिन्हांपासून बहुत उपयोग होतो, हें पाहून मराठी भाषेंतही ही चिन्हें घालण्याची चाल पडावी, अशी इच्छा अलीकडे बहुतांस झाली आहे; म्हणून इंग्लिश भाषेंतील जीं चिन्हें मराठी भाषेंत घ्यावयाजोगीं आहेत, तीं घेऊन, त्यांचेंं ज्ञान सर्व लोकांस व्हावें ह्या हेतूनें, ही परिभाषा केली आहे.”

 

१८५० ह्या सालीच दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांच्या ‘महाराष्ट्र भाषेचें व्याकरण’ ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यांनीदेखील विरामचिन्हांचा परामर्श घेऊन त्यांचा वापर कसा करावा ह्यासाठी काही नियम सांगितले. ह्या काही प्रयत्नांसोबतच मराठीत हळूहळू व्याकरणविषयक पुस्तकांमध्ये आणि लेखननियमविषयक पुस्तकांमध्ये विरामचिन्हांचा वापर कसा करावा ह्याविषयी मार्गदर्शन करायला सुरुवात झाली.

अशा प्रकारे, मराठीत आपण सध्या जी विरामचिन्हे वापरत आहोत ती विरामचिन्हे म्हणजे देवनागरीतील चिन्हे आणि लॅटिनमधील चिन्हे ह्यांचे मिश्रण असलेला संच आहे. देवनागरीतील चिन्हांपैकी दंडाचे प्रयोजन हे पद्यरचनेपुरते मर्यादित झाले. संक्षेपचिन्हाचा वापर हल्ली कमी झाला असला तरी मौजसारख्या काही प्रकाशनसंस्था अजूनही ते वापरताना आढळतात. काकपदाचा वापर हाही सध्याच्या काळात होत असला, तरी ते हस्तलेखनातच जास्त वापरले जाते. लॅटिनमधील चिन्हेही वापरात आहेत; शिवाय सध्याच्या समाजमाध्यमांवर वापरल्या जाणाऱ्या मुक्कामचिन्ह / ॲट (@), क्रमांकचिन्ह / हॅश (#) अशा काही पूरक चिन्हांचीही त्यात भर पडत आहे.

मराठीत किंवा इंग्रजीतही सहसा त्या सर्वांचा एकत्रितपणे उल्लेख विरामचिन्हे किंवा punctuation marks असा केला जातो. ह्या सर्व चिन्हांना एकत्रितपणे ‘विरामचिन्हे’ असे उल्लेखणे उचित ठरत नाही. कारण ह्या सर्व चिन्हांचे कार्य विराम दर्शवण्याचे नाही. त्यांतील काही पूरक चिन्हे आहेत. त्यामुळे ह्या संचाला ‘विरामचिन्हे आणि इतर चिन्हे’ असे म्हटले तर ते अधिक उचित ठरेल.

अशा प्रकारे, मराठीत विरामचिन्हे हळूहळू रुजली आणि आज ती आपल्या लेखनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. १८०५ पासून २०२५ पर्यंतच्या दोन शतकांच्या ह्या प्रवासात, ह्या चिन्हांचा वापर नक्कीच भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पद्धतीत घडून आलेल्या बदलांचाही द्योतक ठरला आहे.




1 टिप्पणी:

अक्षरांचा श्रम

  Facebook, Instagram hyaansaarakhyaa samaajmaadhyamaanvar halli aapan Marathit samparka saadhataanaa kaahiisha ashaach prakaare lihito. Vaa...